धनंजय मुंडे ‘सेटलमेंट’ करणारा विरोधी पक्षनेता; रामदास कदमांची टीका  

0
635

खेड, दि. १५ (पीसीबी)  – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा वापर केला आहे. मुंडे मुख्यमंत्र्यांच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये दोन-दोन तास बोलत बसले असतात. हे त्यांचे वर्तन म्हणजे ‘सेटलमेंट’ आहे. मुख्यमंत्र्यांशी सेटलमेंट करणारा विरोधी पक्षनेता कसा काय होऊ शकतो? असा सवाल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी  केला आहे.

खेड येथे पत्रकार परिषदेत कदम बोलत होते.  खेडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने झालेल्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेदरम्यान मुंडे यांनी रामदास कदम आणि शिवसेनेवर  जोरदार टीकास्त्र सोडले होते. मुंडे यांच्या  या टीकेला कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  मुख्यमंत्र्यांकडे लाचारी पत्करणाऱ्या धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसण्याचा नैतिक अधिकार नाही,  असा  पलटवार कदम यांनी यावेळी केला.

दरम्यान,  खेडच्या महाड नाका येथील मैदानात येत्या काही दिवसांत  शिवसैनिकांची जाहीर विराट सभा घेण्यात येणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या टीकेला उत्तर देण्यात येईल, असे कदम यांनी यावेळी सांगितले.