धक्कादायक….पार्थिव नेण्यासाठी ना शववाहिनी मिळाली, ना कोणाची मदत आणि…

0
199

नाशिक, दि. १४ (पीसीबी) : कोरोनाग्रस्त महिलेच्या निधनानंतर पार्थिव नेण्यासाठी ना शववाहिनी मिळाली, ना कोणाची मदत. अखेर आपल्या माऊलीच्या अखेरच्या प्रवासात तिची कन्याच तिची सारथी झाली. स्वतःच कार चालवत कन्येने आपल्या आईचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेले. नाशिकमधून काळजाला हात घालणारी ही बातमी समोर आली आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर नाशिकमधील संबंधित महिलेचे निधन झाले. मात्र महिलेचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिनी मिळाली नाही. त्यामुळे आईला अखेरचा निरोप देण्यासाठी लेकीने कंबर कसली. ना कोणाची मदत मिळाली, ना कोणाची सोबत. त्यामुळे मुलीने स्वतःच्याच कारमधून आईची अंत्ययात्रा नेली. अमरधाम स्मशानभूमीपर्यंत मायलेकीचा असा प्रवास पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

कोरोना संकट काळात हृदय पिळवटणारे प्रसंग
कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्राने अनेक हृदयाला चटका लावणाऱ्या घटना पाहिल्या. कधी आई-वडील होम क्वारंटाईन असल्यामुळे लेकीवर अंत्यविधी करण्यास बंधन आल्याचं पाहायला मिळालं, तर कधी लॉकडाऊन लेकरं परराज्यात अडकल्यामुळे स्थानिकांनी वृद्ध पालकांना अग्नि दिल्याचं उदाहरण समोर आलं. गावात असूनही आई-वडील अंत्यविधीला नाही. 

मुलीच्या निधनानंतर मुंबईहून पुण्यात आलेल्या आई वडिलांना होम क्वारंटाईन झाल्याने तिचे अंत्यविधीही करता आले नाहीत. मुलीच्या मामानेच तिचे पिंडदान विधी केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील चांडोह येथे गेल्या वर्षी घडली होती. कोरोना दक्षता समितीच्या आक्षेपामुळे गावात असूनही आई वडील अंत्यविधी करु शकले नाहीत. कोरोनामुळे ना अंत्यविधी, ना दशक्रिया विधीना आई वडील येऊ शकले. शेवटी मामांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ठराविक लोकांमध्येच शेतामध्ये भाचीचं पिंडदान केलं.

नातू डोंबिवलीत, मुलगा आफ्रिकेत, वृद्धेवर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार –
लॉकडाऊनमुळे मुलगा-सून बाहेरगावी अडकल्याने सिंधुदुर्गात वृद्धेवर गावकऱ्याने अंत्यसंस्कार केले होते. विशेष म्हणजे आपल्याच घरातील समजून त्यांनी अस्थी विसर्जन, पिंडदान आणि केशार्पण विधीही केले होते.