धक्कादायक… नातवाला कोरोना होऊ नये म्हणून वृध्द जोडप्याने काय केले पहा…

0
262

जयपूर, दि.४ (पीसीबी) – कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देश होरपळून निघत आहे. अशातच देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोरोनाची लागण झालेल्या एका वृद्ध जोडप्यानं रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आपल्यामुळं नातवाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून या आजी आजोबांनी हे टोकाचं पाऊल उचललं. आपल्यामुळं नातवावर कोरोनाचं सावट येऊ नये, या भीतीनं त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळं मात्र, त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.

घटनेनंतर, पोलीस उपअधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी सांगितलं की, सदर दांपत्यांनी रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली आहे. रेल्वे काॅलनी परिसरात राहणारे 75 वर्षीय हिरालाल बैरवा आणि त्यांची 75 वर्षीय पत्नी शांती बैरवा या दोघांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. त्यामूळे ते दोघेही निराश झाले होते. त्यांनी गृह विलगीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्यामुळे आपला नातू रोहित याला कोरोनाचा संसर्ग होईल, याची त्यांना भीती वाटत होती.

दरम्यान, रविवारी घरातील कोणालाही न सांगता हिरालाल बैरवा आणि त्यांची पत्नी शांती बैरवा घरातून निघून गेले. त्यानंतर दोघे रेल्वे स्थानकावर गेले, कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे रूळावर दोघांनी चालत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. तर, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या दांपत्याच्या मुलाचं आठ वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.