देहुरोडमध्ये दोघा सराईत वाहन चोरट्यांकडून ७ दुचाक्या आणि २ ऑटोरिक्षा जप्त

0
933

देहुरोड, दि. १ (पीसीबी) – वाहन चोरी प्रकरणी देहुरोड पोलिसांनी रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ७ दुचाक्या आणि २ ऑटोरिक्षा असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.

निखील उर्फ चिक्या भिकु उर्फ विशाल वाल्मिकी (वय २२, रा. न्यु दिपक आईस फॅक्टरीजवळ, मेन बाजार देहुरोड) आणि बुग्गी उर्फ मुबीन सलीम शेख (वय २३, रा. नविन पाण्याच्या टाकीमागे, गांधीनगर देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा सराईत वाहन चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक हे शनिवारी (दि.२७ ऑक्टोबर) रोजी देहुरोड परिसरातून चोरी झालेल्या दुचाकीचा तपास करत होते. यावेळी त्यांना माहिती मिळाली कि निखील आणि बुग्गी या दोघांनी ती दुचाकी चोरली आहे. यावर पोलीसांनी देहुरोड आणि बोपखेल परिसरात छापा मारुन निखील आणि बुग्गी या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी  ७ दुचाक्या आणि २ ऑटोरिक्षा असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांची वाहने लोणावळा, तळेगाव, खेड, देहुरोड येथून चोरल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच गुन्ह्याची कबुली देखील दिली. आरोपींविरोधात यापूर्वी देखील तळेगाव आणि देहुरोड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल आहे.

हि कामगिरी देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उप निरीक्षक मनोज पवार, सहायक फौजदार सुभाष सावंत, पोलीस नाईक प्रमोद उगले, योगेश जाधव, होमगार्ड संतोष पाटोळे यांच्या पथकाने केली.