देशात सध्या वेगळं चित्र, गंभीर विषयांवरील लक्ष हटवण्यात येतंय – शरद पवार

0
711

पुणे,दि.२१(पीसीबी) – सध्याच्या घडीला देशात जे वातावरण आहे ते देशाची जी अर्थव्यवस्था संकटात आहे त्यापासून लक्ष वेधलं जातं आहे म्हणून निर्माण केलं गेलं आहे का? असा प्रश्न पडला आहे.अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

देशात सध्या वेगळं चित्र आहे, गंभीर विषयांवरील लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायद्यासारखे मुद्दे पुढे आणले जात आहेत. नागरिकत्व कायदा आणून सरकारनं मुद्दाम अस्थिरता निर्माण केली आहे, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला संसदेत विरोधच केला. या कायद्यामुळे सामाजिक-धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी लोकांनी या कायद्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. सध्या देशात जे वातावरण सुरु आहे त्याबाबत चिंता वाटते, असंही ते म्हणाले आहेत.

सरकारने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगानिस्तान या तीन देशातील नागरिकांनाच नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने फक्त तीन देशांचाच विचार केला, इतरांचा का नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे.महाराष्ट्रात हा उद्रेक पोहचेल असं वाटलं नव्हतं. मात्र देशात जे वातावरण निर्माण झालं आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. देशातल्या आठ राज्यांनी आम्ही CAA आणि NRC लागू करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाच्या पाठिंब्यावर नितीशकुमार यांचं सरकार आहे. नितीशकुमार सरकारनेही हीच भूमिका घेतली आहे असंही पवार यांनी सांगितलं.