देशाची एकता, अखंडता, सुरक्षा अबाधित राखण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प

0
153

पिंपरी,दि.०१(पीसीबी) – देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित होऊन योगदान देण्याचा निष्ठापूर्वक संकल्प आज (सोमवारी) महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारताचे माजी गृहमंत्री दिवंगत भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

दिवंगत इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरी करण्यात येते. तर सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. या दिवसाचे औचित्य सादून आज राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी “आम्ही स्वतःला समर्पित करू आणि हा एकतेचा संदेश आमच्या देशवासियांमध्ये पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू तसेच ही शपथ घेताना आम्ही देशाची एकता टिकूवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहोत, जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यामुळे राखणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे देशाची अंतर्गत सुरक्षा निश्चित करण्याकरीता आम्ही स्वतःचे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहोत” अशी शपथ महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी घेतली. जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.

कार्यक्रमास उपायुक्त मनोज लोणकर, विठ्ठल जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल उपस्थित होते.