देशभारातील जनतेला कोरना लस मोफत

0
423

भुवनेश्वर, दि. २६ (पीसीबी) : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावर देशभरातून विरोध होऊ लागला आहे, तसेच सर्वच देशवासियांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे. या मागणीला केंद्र सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. शिवेसनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना बिहारला मोफत कोरोना लस आणि उर्वरित भारत काय बांगलादेश आहे काय, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर लगोलग मोफत लेस देण्याबाबात सरकारचा निर्णय होतो आहे.

देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी दिली आहे. ओदिशाचे अन्न पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आर. पी. स्वॅन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय पशुपालन, डेअरी, मत्स्य, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री सारंगी यांनी सांगितले की, सर्व भारतीयांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे.

स्वॅन यांनी फ्री वॅक्सिनची मागणी केली होती. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सारंगी यांच्याकडे उत्तर मागितलं होतं. हे दोन्ही केंद्रीय मंत्री सध्या ओदिशामध्ये आहेत. बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने घोषणा केली होती की, बिहारमध्ये मोफत कोरोनाची लस दिली जाणार आहे. यावरुन स्वॅन यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना घेरले. त्यानंतर सारंगी यांच्याकडून सारवासारव करण्यात आली.

स्वॅन यांनी ट्विट केले होते की, “मी ओदिशाच्या दोन केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारु इच्छितो. या दोघांनी सांगावं की आपल्या राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत का मिळू नये? कोरोनावरील लसीकरणाविषयीच्या भाजपच्या भूमिकेबाबत दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण द्यावं”.

बिहारमध्ये मोफत लस, मग उर्वरित भारत काय बांगलादेशात आहे का? – ठाकरे
रविवारी ऑनलाईन दसरा मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोला केला. बिहारमध्ये सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांगलादेशात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच इतर राज्यांमध्ये लस विकत देणार का? असा सवालही त्यांनी केला.