देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी दाखल

0
230

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीसांसह भाजपचे राज्यातील चार नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्राकडे लक्ष देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्याकडे करणार आहेत. फडणवीस यांच्यासोबत साताऱ्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील आहेत.

फडणवीस हे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचीही भेट घेणार आहेत. भाजप नेत्यांची राज्यातील साखर उद्योगावर चर्चा होणार आहे. साखर कारखाने संकटात असल्याने मदत करावी, अशी मागणी नेते करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर चारच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. दौऱ्यात आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावरील उपाययोजनांबाबतचे त्यात उल्लेख होता. “आम्ही शक्य ती सर्व मदत तुम्हाला करतो आहोत. मात्र आता परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या कठीण काळात आवश्यकता वाटत असल्यास चर्चेला तयार आहोत” असेही फडणवीसांनी यात म्हटलं होतं.

“संपूर्ण राज्यात रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याचा नीट अंदाज लावून आगामी काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स, तसेच ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा असणारे बेडस्ही उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महापालिका, नगरपालिकांच्या वर्गानुसार, तेथे पुरेशा प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य शासनामार्फत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.” अशी मागणी त्यांनी केली होती.