दुष्काळी उपाययोजनांसाठी राज्यात आचारसंहिता शिथिल करा; मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र   

0
529

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  महाराष्ट्रातील अखेरच्या आणि चौथ्या टप्प्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया  सोमवारी (दि. २९)  पूर्ण झालेली आहे.  त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांची कामे करण्यासाठी  राज्यातील आचारसंहिता शिथिल करण्यात यावी,  अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे  केली आहे.

दुष्काळाच्या निवारण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ४७१४ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक  घ्यावी लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यात  भीषण दुष्काळ पडला आहे. तसेच उन्हाचा तडाखाही वाढला आहे. त्यामुळे  दुष्काळी भागातील जनतेची होरपळ होत आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक प्रकारची कामे तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.  विहिरी खणणे, पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, कॅनालची देखभाल  आदी  कामे ही तीव्र उन्हाळ्यातच करावी लागतात.  राज्य सरकारने १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे, या कामांची वर्कऑर्डर करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

वार्षिक आराखड्यात  मंजूर दिलेल्या  कामांच्या निविदा मागावणे, निविदांचे मूल्यांकन करणे, निविदा अंतिम करणे, कामांचे कंत्राट देणे,  रुग्णालयीन सुविधा, रस्त्यांची कामे, महापालिका आणि गाव पातळीवरची कामे आदींचा आढावा घेण्यासाठी परवानगी मिळावी. दुष्काळी भागातील मंत्र्यांना  दौरा करण्याची परवानगी मिळावी,  अशी मागणी या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी केली आहे.