दुर्देवी: ठाण्यात झोपलेल्या मुलीच्या अंगावर स्लॅब कोसळल्याने मृत्यू

0
423

ठाणे, दि. २६ (पीसीबी) – घरातील छताच्या स्लॅबचे प्लास्टर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीच्या अंगावर कोसळ्याने  त्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. तर मुलीची आई आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना भिवंडी शहरातील गणेश टॉकीज जवळील मार्कंडेयनगर येथील गंगाजमुना इमारतीमध्ये घडली.

साक्षी उमेश एनगुंदला (वय ११) असे मृत मुलीचे नाव आहे. ती सहाव्या वर्गात शिक्षण घेत होती.

गंगाजमुना इमारती ही इमारत सुमारे ३० वर्ष जुनी असून तळ अधिक २ मजली अरुंद इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत उमेश एनगुंदला याची पत्नी स्नेहा व दोन मुली मागील दोन वर्षांपासुन भाड्याने खोली घेऊन राहत होते. पती उमेश कामावर जाऊन आल्यावर रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत परीसरातच बसला होता. तर घरात पत्नी स्नेहा मृत मुलगी साक्षी व जखमी प्रगती या मुलींसोबत झोपली होती. अचानक रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या खोलीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळले. त्यावेळी प्लास्टरचा मोठा भाग साक्षी हिच्या डोक्यात व छातीवर पडला. तर आई स्नेहा व बहीण प्रगती किरकोळ जखमी झाल्या. साक्षी हिला उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.