दुर्गम भागातील लोकांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे दिवाळी उत्सव

0
221

मोशी, दि. १७ (पीसीबी) – आर्ट ऑफ लिव्हिंग मोशी, पिंपरी चिंचवड परिवाराच्या वतीने, कोकणच्या सीमेवरील ताम्हिणी घाट ह्या दुर्गम भागातील आदिवासी, ठाकर, कातकरी समाजातील वंचित, गरजूंना दिवाळी सणानिमित्त दिवाळी फराळ, उबदार ब्लॅकेट, जीवनावश्यक किराणा, महिलांसाठी साड्या, लहान मुलांना खाऊ आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मुळशी तालुक्यातील मुळशी धरणाच्या किनारपट्टी, डोंगर दऱ्याच्या दुर्गम राहणाऱ्या ताम्हिणी घाट, दावडी, निवे, मवरी आदी गावातील कातकरी वस्ती परिसरात 100 कुटूंबाना नवीन दर्जेदार वस्तूंचे वाटप करण्यात आले. हे वाटप आर्ट ऑफ लिव्हिंग साधक आणि ज्ञात-अज्ञात नागरिकांच्या दानातून करण्यात आले. संस्थेतर्फे सलग 9 वर्षे हा उपक्रम दुर्गम भागातच राबवला जातो. ऐन दिवाळी सणात दिवाळी फराळ, मिठाई, तेल, साखर, गुळ, रवा, डाळ, साबुन, दर्जेदार साडी, उबदार ब्लॅकेट, बिस्कीट आदी वस्तू मिळाल्याने आदिवासी जनतेचा आनंद ओसंडून वाहत होता.

आदिवासी पैकी 75 वयाचे झोपडीत राहणारे दापत्य आणि आजी टीमला भेटली. आजपर्यंत त्यांना कोणीही भेटले नसल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळी भेट मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. टीममधील डॉ. दीपक गावडे यांनी सर्व आदिवासीची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार केले. या कामी ताम्हिणीचे सरपंच अर्जुन मरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका सुरेखा बनकर,ओंकार सावंत, गुलाब बनकर, हनुमंत लांडगे, डॉ. दीपक गावडे, आदिनाथ तापकीर, ज्ञानेश्वर बहिरट,पद्मा पावसकर,अनिरुद्ध बनकर हे साधक कार्यकर्ते सहभागी झाले होते.