दीड लाखांच्या चोरीच्या सायकलींसह एकाला डांगे चौकातून अटक

0
720

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – विविध कंपन्यांच्या महागड्या अशा १ लाख ४७ हजार ५०० रुपयांच्या एकूण १३ सायकलींसह एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने चिंचवड येथील डांगे चौकात केली.

विवेक वाल्मिक गायकवाड (वय १८, रा. जोशी चाळ, मातोश्री हॉस्पीटलचे पाठीमागे, गुजरनगर थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या सायकल चोरट्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस कर्मचारी गौस नदाफ यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, डांगे चौकात एक तरुण चोरीच्या सायकली विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून विवेक याला एका सायकलीसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने शहर परिसरातून १ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीच्या एकूण १३ सायकली चोरी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्या सायकली जप्त केल्या असून विवेकला अटक केली आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, संजय गवारे, हजरत पठाण, संदीप ठाकरे, मयुर वाडकर, जमीर तांबोळी, फारुख मुल्ला, चेतन मुंढे, नारायण जाधव, प्रविण दळे आणि लक्ष्मण आढारी यांच्या पथकाने केली.