दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण खेळत आहेत – मायावती

0
412

नवी दिल्ली,दि.२७(पीसीबी) – दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण खेळत आहेत, असं बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती म्हणाल्या आहेत. शिवाय, त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सल्ला देखील दिला आहे.

राजधानी दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) वरून तीन दिवस घडलेल्या हिंसाचाराने ३४ जणांचा बळी घेतला तर २०० पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मायावती यांनी मोठं विधान केलं आहे.

दिल्लीतील हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण खेळलं जात आहे. केंद्राने कोणताही हस्तक्षेप न करता पोलीस व यंत्रणेस स्वतंत्ररित्या काम करू दिलं पाहिजे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अन्य राज्यांमध्ये राजकारण करण्यापेक्षा, दिल्लीतील परिस्थिती सर्वसामान्य करण्यात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. असं मायावती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिल्ली हिंसाचार प्रकरणी आज काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काँग्रेसच्या या प्रतिनिधी मंडळात सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवालासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांचा समावेश होता. यावेळी राष्ट्रपतींनी निवेदन देण्यात आलं.