‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

0
567
पुणे, दि.२७ (पीसीबी) – आलोक राजवाडे  यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे.
सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद सुरु असतानाच आता चित्रपटाच्या नावावरुन नवा वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ‘मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
आनंद दवे म्हणाले, “अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला तरीदेखील तो उघडपणे आपण उच्चारत नाही. मात्र या चित्रपटाच्या नावातच अश्लील हा शब्द आहे. थोडक्यात, या नावावरुन चित्रपटात काहीतरी अश्लील दाखविण्यात येईल, असं प्रेक्षकांना भासविण्यात येत आहे. तसंच या नावामुळे लोकांची लैंगिक भूक चाळावली जाते. त्यामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसत आहे”, असं आनंद दवे यांनी सांगितले
पुढे ते म्हणतात, “चित्रपटाचे नाव पाहिल्यानंतर आम्ही निर्मात्यांना फोन करुन नाव बदल्याची मागणी केली. मात्र प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे नावात बदल करणे शक्य नसल्याचे निर्मात्यांनी सांगितले. मात्र आम्ही आमचा विरोध कायम ठेवणार आहोत”.
“आमचा विरोध हा कायम राहिले. ज्याला हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी तो पाहावा. मात्र आम्ही या चित्रपटाला कायम विरोध करु. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका, नाव बदलण्यामागचं कारण आम्ही लोकांना सांगू. तसंच अशा प्रकारचे चित्रपट पाहू नये असे आवाहन ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केले आहे.”.
ब्राह्मण महासंघाच्या मते, अश्लील उद्योग मित्र मंडळ हा चित्रपट सॉफ्ट पॉर्न चित्रपट आहे. ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हणजे पॉर्न चित्रपटांची पहिली आवृत्ती. अशा स्वरुपाचे चित्रपट पाहिल्यानंतर सहाजिकच लोकांमधील विकृती जागी होते आणि समाजात बलात्कार, अत्याचारासारखी प्रकरणे घडतात. असे दवे म्हणाले