“दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का?”; पाटलांचा मुश्रीफांना खोचक सवाल

0
294

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांना आता मुश्रीफांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांवर 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. तसंच चंद्रकांत पाटील यांच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना खोचक सवाल केलाय. दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.

हॅब्रीड अॅन्यूईटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष 60 टक्के आणि 40 टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही. मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. ते नेहमी 100 कोटीच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका. त्यांचं सरकार येऊन 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. त्यांना कुणी रोखलंय? माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही, असा दावाही पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलाय.किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती. पाटील आणि घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार. चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू. घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसा पासून याची चर्चा करत होते. म्हणून मी सुद्धा आधीच निरोप दिला होता. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.