दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने त्याने केलं असं काही…

0
249

कासारवाडी, दि. ३ (पीसीबी) – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून चार वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाच्या खिशातून जबरदस्तीने तीन हजार रुपये काढून घेतले. ही घटना मंगळवारी (दि. 2) सायंकाळी सात वाजता कासारवाडी येथे स्मशानभूमीच्या समोर घडली.

नासीरचांद शेख (वय 24, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अमजद मोदीन साहब शेख (वय 46, रा. गुलिस्तान नगर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मालवाहतूक गाडी चालवतात. त्यांनी त्यांची पॅगो गाडी (एम एच 12 / एम व्ही 4887) कासारवाडी येथील स्मशानभूमीच्या समोर मंगळवारी सायंकाळी पार्क केली. तिथून घरी जात असताना आरोपी नासीरचांद तिथे आला. त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने त्यांच्या खिशातून तीन हजार रुपये काढून घेतले.

पोलिसात गेल्यास सोडणार नाही, अशी धमकी देत लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या गाडीची तोडफोड केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या गाडीजवळ पार्क केलेल्या जुनेत हिराजी बागवान यांची मालवाहतूक गाडी (एम एच 12 / एल टी 9133), मोसीन गफूर वागवान यांची मालवाहतूक गाडी (एम एच 12 / एन डब्ल्यू 1187) आणि फिरोज अजीज बागवान यांची मालवाहतूक गाडी (एम एच 12 / एल टी 0246) च्या काचा फोडून 15 हजारांचे नुकसान केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.