दाऊद पाकिस्तानातच, खुद्द पाकचीच कबुली

0
206

कराची, दि. २२ (पीसीबी) – दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांच्या यादीमध्ये पाकिस्तानने अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा समावेश केला आहे. पाकिस्तान आतापर्यंत अनेक वर्ष दाऊद त्यांच्या इथे नसल्याचा दावा करत होता. पण आज त्यांनी अखेर दहशतवादी संघटना आणि म्होरक्यांच्या यादीत दाऊद इब्राहिमच्या नावाचा समावेश केला आहे. फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचे दाखवले आहे.

पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत कराची क्लिफ्टन, सौदी मशिदीजवळ व्हाइट हाऊस असा दाऊदचा पत्ता दिला आहे. पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवर निर्बंधांची कारवाई केली आहे. त्यात दाऊदच्या नावाचा समावेश आहे. निर्बंधांच्या यादीत दाऊदचे नाव आणि पत्त्याचा समावेश करणे, याचाच अर्थ १९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी आमच्या इथे राहत असल्याची पाकिस्तानने कबुली देणे आहे.

डी गँगच्या म्होरक्याला आसरा देत असल्याबद्दल भारताने आतापर्यंत वेगवेगळया जागतिक व्यासपीठावर पाकिस्तानला नेहमीच लक्ष्य केले आहे. दहशतवादाला पैसा आणि अन्य माध्यमातून खतपाणी घालणाऱ्या देशांवर FATF चे बारीक लक्ष असते. या संघटनेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने कारवाई केल्याचे दाखवले आहे. हाफीज सईद, मसूद अझर या दहशतवाद्यांवर सुद्धा पाकिस्तानने निर्बंधांची कारवाई केली आहे. पॅरिस स्थित FATF संघटनेने जून २०१८ साली पाकिस्तानचा ग्रे यादीत समावेश केला. पाकिस्तानने निर्बंध घातलेल्या ८८ संघटनांमध्ये भारतविरोधी कारवाया करणारे अनेक दहशतवादी आणि संघटनांचा समावेश आहे.

1993च्या बॉम्बस्फोटांपासून दाऊद इब्राहिम भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड डॉन’ आहे. या यादीतल्या 88 कट्टरतावादी संघटना आणि नेत्यांवर पाकिस्तान सरकारने कडक आर्थिक निर्बंध लावल्याचं जाहीर केलंय. दाऊद इब्राहिमसोबतच जमात-उद्-दावा संघटना आणि हाफिज सईद, जैश – ए – मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर, तालिबान, दाएश, हक्कानी ग्रूप, अल्-कायदा आणि इतरांचा समावेश आहे. या संघटना आणि नेत्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असून त्यांची बँक खातीही गोठवण्यात येणार आहेत.

ज्या देशांचा समावेश ग्रे लिस्टमध्ये होतो त्यांच्यावर हा गट अधिक लक्ष ठेवतो आणि अशा देशांना उपाययोजना कराव्या लागतात. एखादा देश ग्रे लिस्टमध्ये आल्यास त्याचा परिणाम IMF आणि वर्ल्ड बँककडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर आणि इतर देशांसोबतच्या व्यापार संबंधांवर होऊ शकतो.

2019 वर्षाच्या अखेरपर्यंत पाकिस्तानने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असं फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने सांगितलं होतं पण त्यानंतर कोव्हिड 19च्या साथीमुळे पाकिस्ताननला मुदतवाढ देण्यात आली. या यादीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणून पाकिस्तानने या 88 गटांवर आणि त्यांच्या नेत्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा करण्यात आला होता. पण पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावले होते. आता पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याचं पाकिस्तान सरकारने मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. पाकिस्तान सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिमचा कराचीतला पत्ता ‘व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, क्लिफ्टन’ असा देण्यात आलाय.