सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये अनेक चूका; CBI चौकशीदरम्यान डॉक्टरांचा खुलासा

0
329

मुंबई, दि.२२(पीसीबी) – सीबीआयने शुक्रवारी चौकशी सुरु केल्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला. त्यानंतर आज सीबीआयच्या एका टीमने कूपर रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची चौकशी केली. सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या पाचही डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये अनेक चूका असल्याचे सीबीआयच्या टीमच्या निदर्शनास आले आहे.

एवढ्या घाई घाईत सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का करण्यात आलं असा प्रश्न सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी विचारला असता एका डॉक्टरने थेट मुंबई पोलिसांचे नाव घेतले. मुंबई पोलिसांनी आम्हाला लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितलं होतं असा खुलासा या डॉक्टरने केल्याचे टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. १४ जून रोजी सुशांत वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात पंख्याला लढकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच दिवशी रात्री सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले होते.

सुशांतच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर येण्याच्या आधीच म्हणजेच १५ जून रोजी रियाने शवगृहात गेल्याची माहिती समोर आली आहे. तिथे ती ४५ मिनिटं थांबली होती. या प्रकरणावरुन आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. रुग्णालय प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी रियाला शवगृहामध्ये जाण्याची परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होता. रिया सुशांतच्या कुटुंबातील सदस्य नव्हती. त्यात हे प्रकरण आत्महत्येचे असल्याने रियाला सुशांतचा मृतदेह पाहण्याची आणि तिथपर्यंत जाण्याची परवानगी कोणी आणि का दिली यासंदर्भातील अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत. सुशांतच्या कुटुंबाच्या वतीने खटला लढणाऱ्या वकीलांनाही रिया शवगृहामध्ये का गेली होती असा प्रश्न उपस्थित केला आहे.