दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

0
1023

पुणे, दि. २२ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक  आज (गुरूवार) जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर लवकरच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात येणार असल्याचे मंडळाने प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे.  

शिक्षण मंडळाने ऑक्टोबर महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्या वेळापत्रकात शिक्षण मंडळाने काहीही बदल केले नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे आणि मनावरचा ताण कमी व्हावा, शिक्षण मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते.

गुरुवार दि. २१ फेब्रुवारी २०१९ ते बुधवार दि. २० मार्च २०१९ या कालावधीत बारावीची, तर शुक्रवार दि.१ मार्च २०१९ ते शुक्रवार दि. २२ मार्च २०१९ दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फतही परीक्षा घेण्यात येणार आहे.

शाळा आणि महाविद्यालयांना संपूर्ण वेळापत्रक लवकरच पाठवण्यात येणार आहे. तरी सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जाहीर झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाने केले आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर पाहता येणार आहे. वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.