दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कोट्यवधी उधळले- इम्रान खान

0
647

इस्लमाबाद, दि. १३ (पीसीबी) – दहशतवादी संघटना मुजाहिद्दीनला पाकिस्तानने प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल सात लाख कोटी रूपयांचा खर्च केला असल्याचा गौप्यस्फोट खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. गुरूवारी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दहशतवादी पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच दहशतवादाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

“८० च्या दशकात सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यावेळी आम्ही मुजाहिद्दिन लोकांना त्यांच्याविरोधात जिहादाचे प्रशिक्षण देत होतो. त्यांना पाकिस्ताननेच प्रशिक्षित केले आहे. त्यांच्यासाठी अमेरिकेच्या सीआयएकडून (CIA) पैसा पुरवला जात होता,” असे धक्कादायक वक्तव्य इम्रान खान यांनी केले आहे. “आता एका दशकानंतर अमेरिका अफगाणिस्तानमध्ये दाखल झाला आहे आणि त्याच जिहादींना आता अमेरिकेने दहशतवादी म्हणण्यास सुरूवात केली आहे,” असेही ते म्हणाले.

“अमेरिकेचे वागणे हा मोठा विरोधाभास आहे. आम्ही आमच्या ७० हजार लोकांना गमावले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील सात लाख कोटी रूपये गमावले. अखेरिस आमच्या हाती काय लागले? अमेरिकेने आमच्यावरच अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला. पाकिस्तानच्या विरोधात झालेला हा अन्याय आहे,” असं इम्रान खान म्हणाले. गुरूवारी एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी पाकिस्तानने जमात-उल-दावावर अब्जावधी रूपयांचा खर्च केल्याचे म्हटले होते. तसेच या दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा इम्रान खान सरकारचा प्रयत्न असून दहशतवाद्यांना नोकरी आणि पैसे पुरवण्याची जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे असेही ते म्हणाले होते.