थर्टी फर्स्टला ‘दारु नको दुध प्या’ स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा स्तुत्य उपक्रम..

0
289

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – नववर्षाचे स्वागत दारु पिऊन जोरदार पार्टी साजरी करत करण्याची प्रथा समाजात रुजली आहे. सर्वच स्तरातील लोक अशा पद्धतीने पार्टी साजरी करतात. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने नववर्षाचे स्वागत दारु पिऊन न करता दुध पिऊन करण्याचा संदेश दिला. ‘दारु नको दुध प्या’ असा नारा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना मोफत दुध वाटप करण्यात आले. पीएमपीएमएल बस स्थानक, चिंचवडगाव येथे आज (शुक्रवार, दि. 31) हा कार्यक्रम पार पडला.

समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे दिलीप पारीख,
संतोष शेळके, दिपक फल्ले, स्माईल फाऊंडेशनचे संचालक हर्षल पंडित, वैशाली पंडित, प्रशांत खर्जुले, अमर रेड्डी, शितल आठल्ये, सचिन कांबळे, जयंत खेर्डेकर, ओंकार देशपांडे, प्रणव देशमुख राहुल बोरुडे, नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ढमाले डेअरी व मोरया शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरूवातीला माटे हायस्कुल ते पीएमपीएल बस स्टॉप, चिंचवडगाव येथपर्यंत घोषणा रॅली काढण्यात आली. यामध्ये माटे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी ‘दारुने झिंगला, संसार भंगला’, ‘दारुची बाटली फुटलीच पाहिजे’, ‘एक दोन तीन चार ‘व्यसनमुक्तीचा करा प्रचार’, ‘मद्यपान म्हणजे मनोविकार’, ‘मद्य करते बुद्धी भ्रष्ट, त्यापेक्षा दुध श्रेष्ठ,’ अशा घोषणा देण्यात आल्या. नववर्ष स्वागताला मद्यापासून नागरिकांना वंचित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
स्माईल फाऊंडेशनचे संचालक हर्षल पंडित म्हणाले, ‘नववर्षाचे स्वागत दारु पिऊन करण्याची एक चुकीचा आणि आरोग्य घातक सवय समाजात वाढली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना एक सकारात्मक संदेश समाजात द्यावा तसेच लोकांना दारुपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने आम्ही ‘दारु नको दुध प्या’ हा उपक्रम हाती घेतला. यावेळी नागरिकांना दुध वाटप करण्यात आले. लोकांना व्यसनापासून दूर राहून नववर्षाचे स्वागत करावे दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.’