कर्नाटकात भाजपला मोठा धक्का; निवडणुकीत काँग्रेस बनला सर्वात मोठा पक्ष…

0
336

कर्नाटक, दि. १ (पीसीबी) : गुरुवारी झालेल्या कर्नाटक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष 1,184 पैकी 498 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. 58 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1,184 प्रभागांमध्ये मतदान झालं होतं. एकूण 1,184 जागांसाठी निवडणुका झाल्या. यात काँग्रेसनं 498, भारतीय जनता पक्ष (BJP) 437, जनता दल (JDS) 45 आणि इतर 204 जागा जिंकल्या आहेत.

 

 

राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसला 42.06 टक्के, भाजपला 36.90 टक्के, जेडीएसला 3.8 टक्के आणि इतरांना 17.22 टक्के मते मिळाली आहेत. मात्र, शहर नगरपरिषदांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. नगरपालिका परिषदेच्या 166 प्रभागांपैकी काँग्रेसला 61, भाजपला 67, जेडीएसला 12 आणि इतरांना 26 जागा मिळाल्या आहेत. त्याचवेळी नगर नगरपरिषदांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. आकडेवारीनुसार, नगरपालिका परिषदेच्या (Municipal Election) 441 प्रभागांपैकी काँग्रेसला 201, भाजपला 176 आणि जेडीएसला 21 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय पंचायतीच्या 588 प्रभागांपैकी काँग्रेसनं 236, भाजप 194 आणि जेडीएसनं 12 तर इतरांनी 135 प्रभाग जिंकले आहेत.
या यशाबद्दल कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, हे निकाल काँग्रेसची विचारधारा आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या लोकप्रियतेची पुष्टी करतात. अलिकडच्या काळात झालेल्या निवडणुकीच्या निकालांनी राज्यात काँग्रेसची लाट असल्याचे संकेत दिले आहेत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल याचीच प्रचिती देतात. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकेल यात शंका नाही, असं म्हणून त्यांनी मतदारांच्या पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानले आहेत. दरम्यान, 2023 मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.