त्या` महिलेला सांगवी पोलिसांची नोटीस – अनेक मध्यमवर्गीयांची हिच व्यथा, आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट, लक्ष वेधण्यासाठी व्हिडिओ केल्याची कबुली

0
801

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – कोरोनाच्या टाळेबंदीत नेते मंडळींचे मध्यवर्गाकडे कसे दुर्लक्ष होते याची व्हिडिओ क्लिप पोस्ट करणाऱ्या पिंपळे गुरव येथील प्रियांका सचिन शिंदे या गृहिणीला सांगवी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) नोटीस बजावली. लाखो लोकांपर्यंत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे स्थानिक नेत्यांमध्ये जबरदस्त खळबळ उडाली होती. त्याची तत्काळ दखल घेत या महिलेची विचारपूस करण्यात आली. दरम्यान, आपल्या सारख्या असंख्य मध्यवर्गीयांची हीच व्यथा असून सर्वांसाठीच ही व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्याचे श्रीमती शिंदे यांनी पीसीबी टुडेला सांगितले आणि ऋण व्यक्त केले. आपली भावना जनतेची व्यथा मांडण्याची होती, कोणालाही दुखावण्याचा प्रश्न येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमती शिंदे यांच्या व्हिडिओ मध्ये कोरोना च्या बंद काळात गरिबाला मदत मिळते, श्रीमंतांचा गरज नसते, मात्र मध्यवर्गीयांकडे कोणाचेही लक्ष नसल्याची व्यथा मांडली आहे. बंदच्या काळात घरात बसून राहिलेल्या असंख्य मध्यमवर्गीय कुटुंबांना मदतीची गरज आहे, पण एकाही नेत्याचे लक्ष नाही, असे अगदी मनमोकळ्या पध्दतीने कोरोना मुळे सामान्य कुटुंबांचे कसे हाल सुरू आहेत ते कथन केले. मते मागायला येणारे नेते आता कुठे गेले, असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहचला. तो इतका लोकप्रिय झाला आणि तब्बल ५०० वर ग्रुपमध्ये शेअर करण्यात आला. अनेकांनी त्यावर कमेंट केली आणि शिंदे यांच्या धाडसाची वाहव्वा केली. शहराच्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय होता.
व्हिडिआमुळे कुठलाही अनर्थ घडू नये म्हणून सांगवी पोलिसांनी तत्काळ त्याची दखल घेतली. मंगळवारी दुपारी त्यांना बोलावून घेतले आणि श्रीमती शिंदे यांना समज दिली. स्थानिक नगरसेवकांना बोलावून श्रीमती शिंदे यांचे काय प्रश्न आहेत, त्यावर मार्ग लावण्याचे ठरले. श्रीमती शिंदे यांनी त्यावर समाधान व्यक्त केले. पीसीबी चे त्यांनी विशेष आभार मानले. काही नागरिकांनी आपल्या विरोधातही कमेंट दिल्याचे श्रीमती शिंदे यानी मान्य केले. मी आणि माझ्या सारख्या अनेक कुटुंबीयांना आर्थिक व घरगुती अडचणी आल्या पण कसलीही मदत न मिळाल्या मुळे हा व्हिडिओ बनवावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही वेळ राजकारण करण्याची नाही. माझ्यासारखे खूप गरजु आहेत की काही गोष्टी त्यांच्या मनात आहेत, असेही त्यांनी पीसीबी ला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.