`त्या` नगरसेवकांची घरवापसी

0
223

मुंबई, दि. ८ (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पारनेरच्या नगरसेवकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर हे नगरसेवक शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत चारच दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्याच लंके यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा शिवबंधन हाती बांधले.

अहमदनगरमधील पारनेरचे हे पाचही नगरसेवक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली. महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता.

दरम्यान, या एका तालुका पातळीवरील पक्षांतरामुळे राज्याच्या राजकारणात गेले चार दिवस खळबळ होती. थेट मुख्यमंत्र्यांचा पक्ष उपमुख्यमंत्र्यांनी फोडला असा संदेश गेला आणि आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे समिकरण तयार करणार अशी चर्चा सुरू झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये त्यावरून किरकोळ नाराजीचा सूर होता. अखेर मिलिंद नार्वेकर यांनी शिष्ठाई केली आणि ते पाच नगरसेवक पुन्हा शिवेसेनेत दाखल झाले.
‘त्या’ नगरसेवकांचं म्हणणं काय होतं?

“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमची नाराजी नाही. स्थानिक नेतृत्वाला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला. पारनेरचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला”, असं शिवसेनेचे नाराज नगरसेवक म्हणाले होते.

“माजी आमदारांच्या हुकूमशाहीमुळे शिवसेना सोडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. पण, माजी आमदारांमुळे पक्ष सोडवा लागला”, अशी खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
“कोणत्याही विकासाची कामे होत नव्हती, म्हणून आम्ही राष्ट्रवादी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुन्हा शिवसेनेत जाणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आम्ही ‘मातोश्री’वर जाऊन इथली परिस्थिती मांडू. पण, तूर्तास तरी शिवसेनेत पुन्हा परतण्याचा विचार नाही”, असं नगरसेवक म्हणाले होते. मात्र अवघ्या काही तासात त्यांचा निर्णय बदलला आणि त्यांनी पुन्हा सेनेत प्रवेश केला.