…त्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘टॉक टू कॉप्स’ मोहीम

0
246

पिंपरी,दि.३०(पीसीबी) – प्रत्येक बाबतीत पोलिसांनी कारवाई अथवा पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांकडून मागणी केली जाते. मात्र, अनेक बाबतीत पोलीस थेट पुढाकार घेऊ शकत नाहीत. संबंधित संस्था आणि पोलीस यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘टॉक टू कॉप्स’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे पोलीस आयुक्त शहरातील ठिकठिकाणी जाऊन नागरिकांच्या व समाजातील विविध घटकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच पोलिसांच्या कर्तव्याबाबत देखील नागरिकांना सांगणार आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “शहरात अनधिकृतपणे फ्लेक्स लावले जातात. त्या फ्लेक्सवर पोलिसांनी कारवाई करावी. काही ठिकाणी गौण खनिजांची चोरी केली जाते. त्यावर पोलिसांनी थेट कारवाई कारवाई, अशी नागरिक मागणी करतात. मात्र, अशा अनेक अनेक गोष्टींवर पोलीस थेट कारवाई करू शकत नाहीत. अनधिकृत फ्लेक्सवर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. फौजदारी प्रश्न उद्भवल्यास पोलिसांची मदत घेतली जाते. पुढे गुन्हा दाखल करणे आणि अन्य बाबींचा समावेश होतो. परंतु अनधिकृत फ्लेक्स शोधा, त्यावर कारवाई करा, अशी थेट मागणी नागरिकांकडून केली जाते. नागरिकांकडून केली जाणारी मागणी देखील गैर नाही. शहरात सुरु असलेल्या अवैध, बेकायदेशीर आणि त्रासदायक गोष्टी पोलीस बंद करतील, त्याला आळा घालतील, असा नागरिकांना विश्वास असतो. त्याच विश्वासाने ते पोलिसांकडे येतात. पोलिसांचे नेमके काम काय आहे, कोणत्या बाबतीत पोलीस थेट भूमिका बजावू शकतात, हे नागरिकांना माहिती असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले, ‘टॉक टू कॉप्स’ या मोहिमेद्वारे नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या जाणार आहेत.

शहरातील विविध घटकातील नागरिक व प्रतिनिधींशी संवाद साधला जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारी पोलिसांशी संबंधित नसतील, तर त्या संबंधित विभागाकडे पाठवून त्याला सोडविण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कायदेशीर मार्गाने शक्य तेवढी मदत पोलिसांकडून केली जाणार आहे.

बुधवारी (दि. 30) दुपारी पाच ते सायंकाळी सात या वेळेत केशवनगर, चिंचवड येथील कल्याण प्रतिष्ठान येथे ‘टॉक टू कॉप्स’ या मोहिमेचा आरंभ होणार आहे. प्रत्येक आठवड्यात एक दिवस शहरातील एका भागात ‘टॉक टू कॉप्स’ अंतर्गत संवाद साधला जाणार आहे.

चिंचवड पाठोपाठ पिंपळे सौदागर, सांगवी, चाकण, देहूरोड, वाकड येथे हा ‘टॉक टू कॉप्स’ कार्यक्रम होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि महासेतू सोल्युशन्स एलएलपी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.