‘त्यांनी’ धमकी देऊन लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी केली मारहाण; ‘हे’ होतं कारण…

0
293

पिंपरी, दि. 17 (पीसीबी) : खर्चासाठी पैसे देण्यास एकाने नकार दिला. त्यावरून दोघांनी मिळून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री साडेदहा वाजता नेहरूनगर पिंपरी येथे घडली असून याबाबत शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक सुरेश मोहिते (वय 30), अशोक विटकर (वय 31, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अशोक मारुती मोहिते (वय 44, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच सोसायटीमध्ये राहतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी मोहिते रस्त्याने पायी चालत जात असताना आरोपींनी त्यांना खर्चासाठी पैसे मागितले. मोहिते यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून आरोपींनी मोहिते यांना शिवीगाळ करत धमकी देऊन लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर मोहिते यांच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.