तोतया व्यक्ती उभा करून जमिनीचा व्यवहार 66 लाखांची फसवणूक

0
220

आळंदी, दि. १(पीसीबी) – सहा जणांनी मिळून जमिनीच्या मालकाऐवजी तोतया व्यक्ती उभा करून आणि जमिनीचा व्यवहार केला. तसेच जमिनीवर असलेले साहित्य चोरी केले. या संपूर्ण प्रकारात जमीन मालकाची 66 लाख 41 हजारांची फसवणूक झाली. हा प्रकार 30 एप्रिल 2019 ते एक मार्च 2022 या कालावधीत खेड तालुक्यातील चिंबळी येथे घडला.

कुरेशी जकारिया मोहम्मद इलियास (रा. अहमदनगर), इहसान अहमद शमसुद्दीन खान (रा. शुक्रवार पेठ, पुणे), काजी सलाउद्दीन (रा. औरंगाबाद), अंकुश माने (रा. भोसरी), सोफियान मोहम्मद हुसेन कुरेशी (रा. अहमदनगर), शहाबाज अहमद सय्यद (रा. मुकुंदनगर, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एहसान अहमद शमसुद्दीन खान (वय 69, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिंबळी येथे 40 गुंठे शेतजमीन आहे. आरोपी कुरेशी जकारिया मोहम्मद इलियास याने फिर्यादी यांच्या नावाशी साधर्म्य असलेला तोतया व्यक्ती उभा करून फिर्यादी यांच्या 40 गुंठे शेतजमिनीचे 61 लाख 41 हजार रुपये किमतीला खरेदी खत केले. त्या खरेदी खतावर फिर्यादी यांच्या बनावट सह्या केल्या. फिर्यादी यांच्या जागेत असलेल्या पत्रा शेडमधील लोखंडी रॅक, स्क्रॅप पाईप, फर्निचर, एसी, कम्प्युटर, ॲल्युमिनियमची केबिन, कागदपत्रे आणि इतर साहित्य असे एकूण पाच लाख रुपयांच्या सामानाची चोरी केली. एकूण 66 लाख 43 हजार रुपयांची फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक आणि चोरी केली.

40 गुंठे जागेपैकी 12 गुंठे जागा राधा बाळकृष्ण भुजबळ (रा. जाधववाडी चिखली), संदीप पुरुषोत्तम गोळे (रा. निगडी प्राधिकरण), राजेश सिद्धाराम शेटे (रा. काळभोर नगर चिंचवड) या तिघांना सह दुय्यम निबंधक खेड यांच्या कार्यालयात खरेदीखताने विक्री केली. तसेच उर्वरित 28 गुंठे जागा सुरेश शांताराम गंगणे (रा. दिघी भोसरी रोड पुणे) यांना सह दुय्यम निबंधक खेड यांच्या कार्यालयात दस्त करून खरेदीखताने विकली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.