‘तू जर आमची तक्रार पोलिसात केली तर तुला काळेवाडीत राहू देणार नाही’: तरुणाला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
252

काळेवाडी, दि. ७ (पीसीबी) – दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर ‘तू जर आमची तक्रार पोलिसात केली तर तुला काळेवाडीत राहू देणार नाही’, अशी तरुणाला धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 5) रात्री भारतमाता चौक, काळेवाडी येथे घडली.

दीपक चंद्रकांत गायकवाड (वय 19, रा. नढेनगर, काळेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज लोंढे, साहिल शेख (दोघे रा. भारतमाता कॉलनी, काळेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी गायकवाड यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. ‘आम्हाला पाहून गाडीचा हॉर्न वाजवतो का, तू इथला भाई झाला का’, असे म्हणून आरोपी साहिल याने हाताने आणि पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपी सुरज याने देखील मारहाण करत शिवीगाळ केली. ‘तू जर आमची तक्रार पोलिसात केली तर तुला काळेवाडीत राहू देणार नाही’. अशी आरोपींनी गायकवाड यांना धमकी दिली. त्यानंतर दोघे आरोपी दुचाकीवरून निघून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.