“तुम्ही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे”

0
170

मुंबई, दि. १० (पीसीबी) : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात ऑक्सिजन आणि बेडसची कमतरता जाणवत आहे. हा प्रसंग बाका आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेदेखील महाराष्ट्राचे नेते आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या स्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांनी हातात हात घालून काम केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. पुढच्या काही काळासाठी राजकीय अडचणीचे प्रश्न बाजूला ठेवले पाहिजेत. सगळ्यांनीच कोरोनाविरुद्धच्या युद्धात उतरलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका उत्सवाची घोषणा केली. लोकांनी लसीकरणात सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी हे आवाहन केले. मात्र, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लसींची तुटवडा आहे. यावरून कोणताही वाद न घालता केंद्र सरकारने महाराष्ट्राला लस कशी देता येईल, याचा विचार करावा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुण्याला थेट लसींचा पुरवठा, हा तर महाराष्ट्रातील नागरिकांवर अन्याय
केंद्र सरकारने नुकताच पुणे शहराला दीड लाख कोरोना लसींचा साठा पुरवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याला लसींचा थेट पुरवठा करणे हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीच नाचक्की होईल. केंद्राच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. राज्य सरकारचं ऐकलं जात नाही, असा संदेश जाईल, असे राऊत यांनी म्हटले.

फक्त पुण्यातील भाजपच्या महापौरांसाठी केंद्र सरकार हा वेगळा नियम लावत असेल तर हा उर्वरित महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. पंतप्रधान मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. लोक त्यांना आपला नेता मानतात. त्यामुळे आमचं किंवा तुमचं सरकार आहे हे बघून निर्णय घेऊ नका, असेही संजय राऊत यांनी सांगितले.