करोनाला घालवण्यासाठी भाजप मंत्र्याने केली विमानतळावरच पूजा

0
228

इंदूर,दि.१०(पीसीबी) – मध्य प्रदेशच्या पर्यटन मंत्री उषा ठाकूर यांनी करोनाला हरवण्यासाठी एक विशेष युक्ती केलीय. उषा ठाकूर यांनी इंदूरच्या देवी अहिल्याबाई विमानतळावर करोना महामारी संपुष्टात येण्यासाठी अहिल्या देवींच्या प्रतिमेसमोर विशेष पूजा केली. या पूजेसाठी विमातळाच्या संचालक आर्यमा सन्यास यांच्यासहीत संपूर्ण स्टाफही उपस्थित होता.

या दरम्यान उषा ठाकूर भक्तीत दंग झालेल्या अवस्थेत दिसल्या. पूजेदरम्यान त्यांनी टाळ्या वाजवत आराधना केली. उल्लेखनीय म्हणजे, यावेळी मास्क परिधान करणं त्यांना गरजेचं वाटलं नाही. त्या मास्कशिवाय पूजेत बसलेल्या दिसल्या. उषा ठाकूर या बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणीही मास्कशिवाय फिरताना दिसतात. याआधाही ‘हवन सॅनिटायझेशन’बद्दल आपल्या एका वक्तव्यावरून उषा ठाकूर चर्चेत आल्या होत्या. ‘हवन करताना तांदूळ आणि तुपाचं मिश्रण गायीच्या शेणासोबत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी वापरलं तर तुमचं हवनस्थान १२ तासांसाठी सॅनिटाईज होतं’ असा एक शोध उषा ठाकूर यांनी लावला होता.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येतंय. शुक्रवारी एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाहेरच दोन रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत. आकडेवारीवर नजर टाकली असता, मध्य प्रदेशात एव्हाना ३ लाख २७ हजार २२० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ३० हजार ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ४ हजार १३६ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.