तुकाराम मुंडेविरोधातील अविश्वास प्रस्ताव म्हणजे जनतेची दिशाभूल – समीर भुजबळ

0
962

नाशिक, दि. २७ (पीसीबी) – केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्याने त्यांना एका दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करता येऊ शकते. मात्र, नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याविरोधात भाजपकडून आणलेला अविश्वास प्रस्ताव म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.

मुंडे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून सत्ताधारी भाजप नाशिककरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. जनतेचा कळवळा असल्याचे दाखवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मुंडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला जात आहे. मात्र,   सरकारकडून तो पुढे विखंडीत होण्याची शक्यता आहे. एखादया चित्रपटाला शोभेल असे हे स्क्रिप्ट आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली .

तुकाराम मुंडे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असताना अविश्वास प्रस्तावाला   सरकारने केराची टोपली दाखवली होती, हे जनतेने बघितले आहे. पनवेल मनपाचा सुदधा अविश्वास प्रस्ताव शासनाने विखंडीत केला होता. त्यामुळे केवळ अविश्वास प्रस्तावाद्वारे एक राजकीय खेळी करण्याचा कुटील डाव भाजपचा आहे. भाजपचा हा कुटील डाव जनआंदोलनद्वारे हाणून पाडू, असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.