तीन मंत्र्यांना धुळे जिल्हाबंदीची मागणी; भाजप आमदार अनिल गोटेंची निवडणूक आयोगाकडे मंत्र्यांची तक्रार

0
1069

धुळे, दि. २३ (पीसीबी) – जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच भाजपचे शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी शहराध्यक्ष हिरामण गवळी, प्रदीप कर्पे यांचे गुंडाशी लागेबांधे आहेत. त्यामुळे या सर्वांना १० डिसेंबरपर्यंत धुळे जिल्ह्यात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगाने दोन दिवसांत या मागणीची अंमलबजावणी न केल्यास वाद्ग्रस्त ऑडिओ क्लिप मुंबईतून माध्यमांसमोर जनतेसाठी खुली करू, अशा इशाराही आमदार गोटे यांनी दिला आहे.

यासंदर्भात आमदार गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ते म्हणाले, “माझी व माझ्या कुटुंबियांची सोशल मीडियाद्वारे बदनामी करणाऱ्या विनोद थोरातला चाळीसगाव येथून अटक करण्यात आली. त्याच्या फोनवर मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांचे फोन गेले आहेत. त्याबाबतची क्लिप मला मिळाली आहे. या क्लिपसह राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. धुळे शहरातील काही गुंडांच्या टोळ्यांशी तीन मंत्र्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. याच तीन मंत्र्यांवर धुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत गुंडगिरी आणि अधिकारांचा सर्रास दुरूपयोग होण्याची शक्यता आहे. निवडणूक मुक्त मोकळ्या वातवरणात होऊच शकत नाही. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजप शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी शहराध्यक्ष हिरामण गवळी, प्रदीप कर्पे या सर्वांसह मंत्र्यांच्या स्वीय सचिवांना धुळे जिल्ह्यात १० डिसेंबरपर्यंत प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे. त्यावर अंमलबजावणी न झाल्यास सोमवारी (दि. २५) सकाळी साडेदहा वाजता मंत्र्यांच्या वाद्ग्रस्त संभाषणाची क्लिप माध्यमांसमोर जनतेसाठी खुली करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.”