तिसऱ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर २०३ धावांनी विजय

0
778

लंडन, दि. २२ (पीसीबी) –  इंग्लंडच्या विरूध्दच्या तिसऱ्या कसोटी  सामन्यात भारताने पाचव्या दिवशी इंग्लंडवर २०३ धावांनी विजय मिळवला. या  विजयामुळे भारताने या मालिकेत आपल्या विजयाचे खाते खोलले आहे. तर इंग्लंड  २-१ ने आघाडीवर आहे. इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने ४ गडी गमावले. त्यानंतर बटलर-स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी करत इंग्लंडचा डाव  सावरला.  

नव्या चेंडूवर भारताच्या जसप्रीत बुमराने ५ बळी टिपत इंग्लंडची आघाडीची फलंदाजी मोडून काढली. त्यामुळे भारताला इंग्लंडच्या भूमीत ४ वर्षांनी विजय नोंदवता आला.  इशांतने २, अश्विन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याने १-१ गडी बाद करून भारताला विजयापर्यंत पोहचवले. पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात १०३ धावा करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीरचा किताब देण्यात आला.

पहिल्या सत्रात इंग्लंडने सलामीवीर जेनिंग्स (१३), अॅलिस्टर कुक (१७), कर्णधार जो रूट (१३) आणि नवोदित ओली पोप (१६) हे चार गडी गमावले. पण दुसऱ्या सत्रात इंग्लंडने पूर्ण वर्चस्व राखले. जोस बटलर आणि बेन स्टोक्स जोडीने १७९ धावांची भागीदारी केली. बटलरने झुंजार शतक (१०६) केले. पण बुमराने त्याला बाद केले. पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर, वोक्स ४ धावांवर आणि स्टोक्स ६२ धावांवर बाद झाला.

दरम्यान भारताने दुसरा डाव ७ बाद ३५२ धावांवर घोषित केला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी ५२१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. तत्पूर्वी दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी खेळताना चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी डाव सावरला. दुसऱ्या सत्रात पुजारा ७२ धावांवर बाद झाला. कोहलीने मात्र शतक ठोकले. हे त्याचे कसोटीतील २०वे, तर कारकिर्दीतील २३ वे शतक ठरले.  डावाच्या शेवटच्या एका तासात हार्दिक पांड्याने तडाखेबाज अर्धशतक (५२) ठोकले. त्यामुळे भारताला भक्कम आघाडी मिळाली. रशीदने ३, स्टोक्सने २ तर वोक्स आणि अँडरसनने १-१ बळी टिपला.