तानाजी सावंत मराठा समाजाची माफी मागा

0
207

 – वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा एकही मंत्र्याला राज्यात फिरकू देणार नाही, असा इशारा मोर्चाने दिला आहे.

सत्तांतर होताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. सावंत उस्मानाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. मात्र, गेली 2 वर्षे हे सर्व जण शांत होते, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक योगेश केदार यांनी सांगितले की, सावंत यांनी आधी सकल मराठा समाजाची माफी मागावी. तानाजी सावंत यांनी मराठा समाजाने ओबीसी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना तारतम्य बाळगावे. तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काहीतरी भान राहिले आहे का? जर तुम्हाला उघड समाजाच्या भूमिकेसोबत येणे शक्य नसेल, तर कमीत कमी विरोध तरी करू नका. आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा.”
तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब हलक्यात घेऊ नये. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा महाराष्ट्रात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही.