तळेगावात दुचाकीवरुन बहिणीला घरी आणण्यासाठी निघालेल्या भावाचा अपघाती मृत्यू

0
488

तळेगाव, दि. १ (पीसीबी) – दुचाकीवरुन बहिणीला घरी आणण्यासाठी निघालेल्या भावाचा ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२८ फेब्रुवारी) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तळेगाव-चाकण रस्त्यावर घडली.

प्रतीक विजय ढोरे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रतीक ढोरे हा कामावरून आलेल्या बहिणीला आणण्यासाठी तळेगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. यावेळी भरधाव कंटेनरने प्रतीकच्या दुचाकीला समोरून धडक दिली. अपघात झाल्यानंतर प्रतीक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात नेले. परंतु उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. प्रतीकने दुचाकी चालवत असताना हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. कदाचित त्याने हेल्मेट घातले असते तर तो वाचला असता. प्रतीक १२ वीत शिकत होता. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला असून तळेगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.