तळवडेतील ‘डिअर पार्क’ची जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण!

0
219

– आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
– राज्य शासनाच्या वन विभागाचा महत्त्वाकांक्षी निर्णय

पिंपरी, दि. 18 (पीसीबी):राज्यातील पहिला डिअर पार्क आणि प्राणी संग्रहालयाच्या आरक्षित जागेचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या वनविभागाने घेतला आहे. याबाबत गुरुवारी महसूल व वनविभागाने अद्यादेश जारी केला.

भोसरी विधानसभा मतदार संघात असलेल्या तळवडे येथे पिंपरी-चिंचवड महापालिका विकास आराखड्यानुसार सर्व्हे नं. १ ब मध्ये हरिण उद्यान (डिअर पार्क)/ प्राणी संग्रहालयाचे आरक्षण आहे. मात्र, ही जागा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या ताब्यात होती. परिणामी, हा प्रकल्प सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासनाला तांत्रित अडचणी येत होत्या.

दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी २०१६ पासून ‘डिअर पार्क’ आरक्षण विकसित करण्यासाठी जागा महापालिकेकडे हस्तांतरित करावे, याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल व वनविभागाकडे वारंवार मागणी केल्यानंतर अखेर आज (१७ डिसेंबर २०२०) शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास…
आमदार महेश लांडगे यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांत असलेली आरक्षणे विकसित करण्यासाठी पुठपुरावा सुरू केला. नुकतेच संविधान भवन, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणीसुद्धा केली आहे. मात्र, ‘रेडझोन’ची हद्द आणि वन विभागाची जागा असल्याने डिअर पार्क / प्राणी संग्रहालयाची जागा हस्तांतरित करण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यासाठी २०१६ पासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

३ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे बंधन…
तळवडे येथे तब्बल ५६ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिअर पार्क साकारणार आहे. त्याचे काम २०२१मध्ये सुरू होईल. अवघ्या ३ वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करावा, असे बंधन वन विभागाने अर्थात राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला घातले आहे. देश-विदेशातील पर्यटकांना पिंपरी-चिंचवडमधील डिअर पार्क आकर्षित करणार आहे. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे.

पर्यटन विकासासह रोजगार निर्मिती होईल : आमदार लांडगे
महापालिका विकास आराखड्यानुसार तळवडे येथील जागेवर डिअर पार्क / प्राणी संग्रहालयाचे आरक्षण आहे. संबंधित आरक्षण वनविभागाकडून हस्तांतरित केल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पहिले डिअर पार्क/ प्राणी संग्राहलयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात एक-दोन मोठे प्रकल्प असलेल्या आरक्षणांचा विकास होत आहे. पण, रेडझोनच्या जाचक अटींमुळे तळवडे भागात अनेक वर्षांपासून डिअर पार्कचा प्रकल्प प्रलंबित होता. याची खंत कायम होती. संबंधित आरक्षण हस्तांतरित करण्याच्या मागणीला अखेर यश आले. डिअर पार्कमुळे पर्यटन विकासासह रोजगार निर्मितील होईल, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

आमदार महेश लांडगेंचा ‘विंटर धमाका’…
पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी करीत आमदार लांडगे यांनी त्याचा पाठपुरावा सुरू केला. त्यापूर्वीच महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमला मंजुरी देण्यात आली. यासह जगातील पहिले संविधान भवन, औद्योगिक प्रदर्शन केंद, सफारी पार्क, मनोरंजन केंद्र आदी पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्पांना चालना देण्याची भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी आमदार लांडगे यांनी कृतीशील आराखडा तयार केला आहे. त्यामुळे विकास प्रकल्पांसाठी गेल्या काही दिवसांपासून लांडगे यांनी ‘विंटर धमाका’सुरू केला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.