‘…तर जशास तसे उत्तर देऊ’

0
223

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची शिवसेना भवनासमोर जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. त्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला सज्जड इशारा दिला आहे. ‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल’, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

शिवसेना भवनासमोर सेना-भाजपमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यावर जशास तसे उत्तर दिलं जाईल. झालेल्या हल्याची माहिती नाही. पण भाजपच्या कार्यकर्त्यांवर असा हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल, असा इशारा राणेंनी दिला.

‘गुंडगिरी खपवून घेणार नाही’
खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी, दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कवच घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमच्या आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का?
मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी. इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखं काय होतं? प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचं कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली?, असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.

गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा
अयोध्येतील जमीनखरेदी व्यवहार पारदर्शक असल्याबाबत रामजन्मभूमी ट्रस्टकडून कराराचा सविस्तर तपशील जारी करण्यात आलाचं वृत्त भाजप आमदार अतुल भातखळकरांनी ट्वीट केलंय. ‘राममंदिराच्या धर्मकार्यात अडथळा आणणारी शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक आहे. काँग्रेस, शिवसेना, आदी विरोधकांनी केलेले आरोप बोगस होते हे उघड झाले आहे. सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगड घालाल तर गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा. जय श्रीराम’, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी शिवसेनेला जोरदार लगावला आहे.