…तर उद्या होणार संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय

0
378

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : लॉकडाऊन करण्याची इच्छा नाही, परंतु, लॉकडाऊन करायचा की नाही हे तुमच्या हातात आहे, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु, वीकेंड लॉकडाऊन सुरू होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी उद्या शनिवारी सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या बैठकीचे अनेक अर्थही काढण्यात येत आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्ण संख्येप्रमाणेच कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. राज्यातील अनेक स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी जागाच मिळत नाही. तर काही ठिकाणी मृतदेहांचं सामूहिक दहन केलं जात आहे. शिवाय राज्यात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून राज्यभर अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलं आहे, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असून त्यात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. दोन दिवसात आहे तो साठाही संपुष्टात येणार आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. केंद्राकडून लस येईपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्याची सरकारची मानसिकता असून त्यासाठीही विरोधकांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यातील वीकेंड लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. व्यापाऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू केली आहेत. तसेच सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे. व्यापाऱ्यांना राजकीय पक्षांकडूनही बळ मिळत असल्याने सर्वच राजकीय पक्षांना वस्तुस्थितीची माहिती करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय बैठक केली असावी असं सांगितलं जातं.

राज्यात कोरोना लसीचा साठा अत्यंत कमी आहे. राज्यात काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या राजकारणात केंद्र सरकारही उतरलं आहे. त्यामुळे कोरोनाची महामारी असताना राजकारण न करता समन्वयाने या संकटाचा सामना करता यावा म्हणूनही मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याचं सांगितलं जातं.

देशात पाच दिवस पुरेल एवढाच कोरोना व्हॅक्सीनचा साठा आहे. नव्या व्हॅक्सीनच्या साठ्यासाठी बराच वेळ जाऊ शकतो. तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट पसरू नये आणि नागरिक सुरक्षित राहावेत याकडे सरकारचं लक्ष आहे. कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. या नव्या स्ट्रेनमुळे एका व्यक्तीपासून अनेक लोक बाधित होत आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन करण्याची गरज आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तेवढा अवधी देण्याची गरज आहे. त्यामुळेच लॉकडाऊन कसा अपरिहार्य आहे, हे विरोधकांना समजावून सांगण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण कसं आणता येईल? विरोधी पक्षांच्या याबाबत काय सूचना आहेत? हे जाणून घेण्यासाठीही उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याचं सूत्रांनी सांगितलं.