तब्बेत बिघडल्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील रुग्णालयात

0
76

पुणे, दि. १४ (पीसीबी) – देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांकडून प्रतिभाताई पाटील यांच्यावर उपचार सुरू आहे. प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ वर्ष इतके आहे. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. २००७ ते २०१२ त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रतिभाताई पाटील यांची प्रकृती बरी नाही. काल (बुधवारी ता. १३) अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं.

डॉक्टरांनी प्रतिभाताईंवर उपचार सुरू केले आहेत. कायदेतज्ज्ञ असलेल्या प्रतिभाताई पाटील जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या होत्या. नंतर त्या एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री आणि त्यानंतर सतत २० वर्षे त्यांनी निरनिराळ्या खात्याची मंत्रीपदे सांभाळली.

आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, समाजकल्याण सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य समाजकल्याण, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री, असे मंत्रीपदे भूषवत विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड, राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी स्विकारली. १९९१ साली त्या अमरावतीतून लोकसभा सदस्य झाल्या. राष्ट्रपती पदावर असताना प्रतिभाताई पाटील यांनी संपूर्ण जगात त्यांनी भारताची नवी ओळख करून दिली.