तब्बल ८७७ मृत्यू महापालिकेने लपवले

0
338

– पिंपरी चिंचवड महापालिकेचा कोरोना मृतांच्या संख्येत मोठा झोल

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेनेसुध्दा मृत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठा झोल केल्याचे उघड आले आहे. कोरोना वेगात वाढत गेल्यापासून म्हणजे १ ते २३ एप्रिल दरम्यान शहरात ज्या स्मशानांतून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार होतात ती संख्या तब्बल १८१२ असताना महापालिकेच्या याच कालावधीत प्रसिध्दीपत्रातील संख्या फक्त ९३५ आहे. एकूण ८७७ मृत्यू लपविल्याचे त्यातून सिध्द होते.

कोरोना मृतांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. महापालिकेच्या वतीने अशा सर्व मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात. सुरवातील कोरोना मृतांवर फक्त विद्यत दाहिनीत अंत्यसंस्कार होत असत. नंतर दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढू लागली. एका मृतदेहाला किमान दीड ते दोन तास लागत असल्याने प्रतिक्षा वाढू लागली. त्यामुळे नातेवाईकांचीही कुंचबना सुरू होती. अखेर महापालिका आयुक्तांनी परवानगी दिल्यावर लाकूड वापरून अंत्यसंस्कार सुरू कऱण्यात आले.

एप्रिल महिन्यात १ ते २३ तारखे दरम्यान महापालिकेच्या वतीने सर्वाधिक कोरना अंत्यसंस्कार भाटनगर (७४३) स्मशानात करण्यात आले. त्याखालोखाल भोसरी स्मशान (६०१), निगडी स्मशान (३५०) आणि सांगवी (११८) असे एकूण १८१२ कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील आणि बाहेरगवच्या सर्व मृतदेहांवर रितसर नियमानुसार हे अंत्यंसंस्कार झाले. स्मशानातील रजिस्टर वहित कोरोना मृतांपुढे के असा शेरा असतो. त्याची पडताळणी केली असता चारही प्रमुख स्मशानांतून १८१२ मृतदेहांवर रितसर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे.

महापालिकेच्या वतीने रोज कोरोना अहवाल प्रसिध्द केला जातो. १ एप्रिलच्या अहवालात महापालिका हद्दीतील आणि बाहेरगावची मिळून एकूण मयतांची संख्या २८५७ आणि २३ एप्रिलच्या प्रसिध्दीपत्रकात ३७९२ आहे. म्हणजेच २३ दिवसांत फक्त ९३५ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केल्याचे महापालिका सांगते. चारही स्मशानातील नोंदणी पुस्तकात १८१२ आणि महापालिकेच्या प्रसिध्दीपत्रकात ९३५ संख्या दर्शविते. त्यातील फरक हा जवळपास दुप्पट म्हणजे ८७७ आहे. महापालिकेने हे मृतांचे आकडे लपविले असण्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. शहरातील फक्त चार स्मशानातील कोरोना अंत्यसंस्कारांची माहिती हातात आहे. शहरात एकूण २५ स्मशान असून त्यातील मुस्लिम, ख्रिश्चन दफनभूमितील अंत्यसंस्काराची संख्या स्वतंत्र आहे. त्यामुळे आकड्यांच्या झोल मोठा असण्याची शक्यता आहे.