स्मशानात २४ तास राबणाऱ्या सच्चा कोरोना वॉरियर्सना सलाम – किशोर हातागळे

0
290

दुपारची दिड वाजण्याची वेळ, नुकतीच “जागतिक पुस्तक” दिनानिम्मित पोस्ट लिहली, थोडं पाणी पिऊन नुकतं बसलोच होतो आणि तेवढ्यात सिमाताईंचा फोन आला “निगडीच्या स्मशानभुमीत एका महिन्यात झालेल्या कोरोना आणि इतर मृत्यूची काय परिस्थिती आहे? याची ताईंनी खुप गांभीर्याने माहिती विचारली, मागील काही दिवसांपूर्वी निगडी अमरधाम स्मशानभुमीत कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांच्या रांगा असलेल्या रुग्णवाहिकांचा व्हिडीओ सगळीकडे प्रसिद्ध झाल्यावर ताईंनी आवर्जुन त्याचीही माहिती माझ्याकडून घेतली होती, त्यावेळीही त्यांना खुप वाईट वाटलं होतं, शहरातील नागरिकांचे असे मृत्यु होताना साहजिक वाईट तर वाटतच ना, ताई शहरातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासनाला तशा सुचनाही तात्काळ करत असतात. निगडी अमरधाम स्मशानभुमी तशी प्रशस्त असुन देखील अंत्यविधीसाठी “वेटिंग” असणं ही बाब खरचं चिंताजनक आहे.

निगडी स्मशानभुमी ऐरवी आपण सर्वांनी पाहिली आहे दोन किंवा तीन मयती जळतानाही हृदयावर मोठ्ठा दगड ठेवल्यासारखी व मन हेलावून टाकणारी भयानक परिस्थिती वाटायची, मयतीच्या ठिकाणी रडणारे नातलग आणि त्यांच्या त्या हृद हेलावून टाकणाऱ्या किंकाळ्या, पाहुण्यागणिक वाढणारा आक्रोश, घरातील आपला हक्काचा माणुस ज्याच्या बरोबर आपण काल परवापर्यंत खुप बिनदास्तपणे आयुष्य जगत होतो, निवांत आणि शांतपणे झोपत होतो ती घरातील सर्व मुलं, बायको, आई वडील अशी एकदम जीवाला जीव देणारी माणसं सोडून जगाचा निरोप घेऊन ती मृत्यु झालेली व्यक्ती, जगाचा निरोप घेऊन शेवटी त्या स्मशानातच आणली जाते, कुटुंब अक्षरशः तुटून पडतं, भुक नाही तहान नाही, झोप नाही, रात्रभर जागून रडत-पडत असणारी घरातील ती माणसं फक्त त्या गेलेल्या माणसाला शेवटचा निरोप देण्यामुळे आणि त्या मयत झालेल्या व्यक्तीबरोबर अंत्यविधी होण्यापर्यंत अशक्त शरीराची तग सोडत नाहीत. माणसाच्या आयुष्याचा खरचं काही भरवसा आहे का ?

आम्ही लहानपणापासुन निगडी स्मशानभुमीत कित्येक मयती पाहिल्या कितीवेळा तरी तेथील भेसुर परिस्तिथी पाहुन अस्वस्थ झालो, तिथली परिस्थिती आणि वातावरण मनाला न पटणारं असतं, कानाडोळा केला तरी समोरची परिस्थिती पाहुन मन आतुन ओलंचिंब होऊन जातच, ताईंचा जेव्हा फोन आला तेव्हा सगळं हे डोळ्यासमोर उभा राहिलं..!

मग मी सरळ स्मशानभुमीकडे निघलो, रस्त्यातच नेहमी स्मशानभुमी व विद्युतदाहिनीच्या समस्येबाबत अग्रेसर असणारे आमचे मित्र व सामाजिक कार्यकर्ते दिपकजी खैरनार भेटले व त्यांनाही सांगितलं तिकडे चाललोय माहिती पाहिजे, त्यांनीही होकार देत, आम्ही दोघे तिकडे गेलो, स्मशानभुमीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच काही तरुण वर्ग वाय.सी.एम हॉस्पिटलवरून येणाऱ्या डेडबॉडीची वाट पाहत होते, तिथे गेल्यावर नकळत त्याचा अंदाजही आलाच.

आम्ही आत गेलो, तिथले सर्व कर्मचारी ओळखीचे असल्याने मुख्य प्रवेशद्वारावरच्या सुरक्षारक्षकाकडे गेलो, मयत आली की पहिल्यांदा मेनगेटवरच आलेल्या सर्व मयतींची नोंद करावी लागते त्याचेही एक रजिस्टर असते ते “मयत रजिस्टर”. त्यात अनुक्रमांक, दिनांक, मयताचे नाव पत्ता, मृत्यु वेळ, लिंग व विद्युतदाहिनी का अग्नी असा त्या रजिस्टरवरील मजकुर. हे रजिस्टर बघुन मनात सहज एक विचार आला त्या यमदेवाकडेही असेच एक रजिस्टर असेल, मयत रजिस्टर..!

दिनांक ०१ एप्रिल ते आज दुपारी म्हणजेच २३ एप्रिल पर्यंत कोरोनाने आणि इतर मृत्युने झालेल्या मयतींची माहिती बघायला ते रजिस्टर हातात घेतले, त्या रजिस्टरवर मयत झालेल्या नागरिकांच्या नावासमोर K असं लिहलं होतं, “K म्हणजे कोरोना मृत्यु” असं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं, मयतींचे रजिस्टर त्यात सगळीकडे दिसणारा K पाहुन खरचं खुप वाईट वाटत होतं, ०१ एप्रिलच्या पानापासुन सुरुवात केली पण पानं काही संपत नव्हती आणि मयतीच्या संख्येचा आकडा वाढतच होता, पानं पलटत आम्ही दोघेही मयतीचा आकडा मोजत होतो, त्यात न राहुन मयतांचे वय, स्त्री-पुरुष यांच्यावर नजरा जातच होत्या, मनातील विचार संपत नव्हते कुणी ऑक्सिजनवाचुन, कुणी बेडवाचुन, कुणी वेळेवर उपचार व औषध न भेटल्यामुळे कोरोनाने मृत्युमुखी पडले, या जगातुन अचानक “एक्झिट” झाले, कोरोना नसता तर ही माणसं अजुनही कित्येक वर्ष जगली असती, अपघाताने जशी माणसं अचानक अर्ध्यावरच सर्व सोडून जातात तशीच माणसं आता मरत आहेत, हेच डोक्यात सुरू होतं आणि तेवढ्यात बाहेरून जोरात रडण्याचा आवाज येऊ लागला, डेडबॉडीची वाट बघत असलेले काही तरुण आणि त्या घरातील महिला यात चालत येत होते महिला जोरजोरात रडत होत्या, मग त्या रजिस्टरकडे बघुन अस वाटू लागलं की रजिस्टरमधील मृत नागरिकांचे नातेवाईकही जोरात रडत आहेत आणि कित्येक बोलके आवाज त्या रजिस्टरमध्ये मृत अवस्थेत बंद झाले, रजिस्टरवर हात फिरवताना या सर्व मृत झालेल्यांना स्पर्श होतोय अशीच भावना होऊ लागली, २३ दिवसात निगडी स्मशानभुमीत एकुण ५६० मयती. फक्त कोरोनाने ३५८ आणि इतर २०२ जणांच्या मयती याठिकाणी झाल्या, दिवसाला साधारण ३० ते ४० पेक्षा जास्त मयतीवर विद्युतदाहिनी व अग्नीडाग देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले, इतक्या मयती, कधी या स्मशानभुमीने आणि यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि निगडीकरांनी पाहिल्या नसतील, याठिकाणी दिवसरात्र काम करणारे खरे हिरो आमचे मित्रगण यांच्या कार्याला खरचं सलाम, तुमच्यात इतकी हिम्मत येते कुठून ? समजत नाही, आम्ही एक मयत केल्यावर दिवसभर इतके भावनिक होतो की दुसरीकडे कुठेच मन लागत नाही, तुम्ही इतक्या आक्रोशात रडापडीतही आपलं काम योग्यप्रकारे करता, निर्भीडपणे आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता बिनदास्तपणे मयतांवर सर्व अंत्यविधी पार पाडता, खरचं तुमच्या कार्याला आमचा सलाम..!

जगाचा निरोप घेतल्यावर सुद्धा प्रत्येक मयतांवर आदरानेच अंत्यसंस्कार व्हावे, भाटनगर स्मशानभुमीप्रमाणे ओटे कमी असलेल्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी मयताची हेळसांड करत भुईवर ठेऊनच अंत्यविधी करावे लागतात यासाठी जास्त प्रमाणात जाळ्यायुक्त ओटे बांधावे मृत व्यक्तीची फरफट होऊ नये, मृत्यू नंतरही मयताला आदरानेच अंत्यसंस्कार मिळावे यासाठी अग्नीडाग देणाऱ्या ओट्याची संख्या वाढवावी अशी मागणी ताई आपण गांभीर्याने दखल घेऊन केलीत खरचं ही कौतुकास्पद गोष्ट आहे..!

या लेखन प्रपंचातुन मला हा अविस्मरणीय अनुभव आपल्याशी शेअर करायचा होताच पण परिस्थिती किती नाजुक व कठीण आहे हे ही सांगायचं होतं, आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे, फक्त एकदा प्रत्येकाने हा विचार करावा “जर आपल्या कुटुंबावर अशी वेळ आली, घरातील एखादा व्यक्ती असा अचानक गेला तर ?” त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळा नाहीतर नियमचा “नि” सुटून जातो आणि शेवटी मागे “यम”च वाट बघत उभा असतो याचाही आपण गांभीर्याने विचार करा…!

✍🏼- #किशोर_काशिनाथ_हातागळे