ऑक्सिजन अक्षरशः तोंडाने दिला, पण त्यानंतर…

0
564

लखनऊ,दि.२४(पीसीबी) – संपूर्ण देश सध्या कोरोना महामारीच्या या भयानक संकटाला तोंड देत आहे. देशात दररोज लाखा पेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश, राजधानी दिल्लीतही भयावह परिस्थिती आहे. रुग्णालयांबाहेर अनेक रुग्ण ताटकळत उपचारासाठी वाट बघत आहेत. पण त्यांच्यापर्यंत डॉक्टर वेळेवर पोहोचू शकत नाहीयत. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होतोय. उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.

आगऱ्यात ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने 47 वर्षीय रवी सिंघल यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पत्नी रेनू सिंघल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. रेनू आपल्या पतीला रिक्षातून दोन-तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेल्या. मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे रेनू आपल्या पतीला रिक्षाने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात होत्या. पण यादरम्यान त्यांचे पती रवी यांनी जीव सोडला. रेनू यांनी पतीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. रवी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नी रेनूने तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.

सिंघल कुटुंब आगऱ्यात विकास सेक्टर सात येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, घरातला कर्ता पुरुष रवी सिंघल यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे पत्नी रेनू यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीने रवी यांनी रुग्णालयात रिक्षाने नेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रेणू आपल्या पतीला घेऊन श्रीराम हॉस्पिटलला घेऊन गेल्या. त्यानंतर साकेत हॉस्पिटल, केसी नर्सिंग होम येथे घेऊन गेल्या. मात्र, या तीनही ठिकाणी ऑक्सिजन बेड मिळाला नाही.