डोणजे येथे कोयत्याने वार करुन तरुणाचा खून

0
4908

डोणजे, दि. ९ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तिघा हल्लेखोरांनी एका तरुणाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना सोमवारी (दि.७) रात्री दहाच्या सुमारास डोणजे येथे घडली.

राहुल अनंता नलावडे (वय २६, रा. डोणजे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात संदेश कोंडेकर (वय १९), निखील ऊर्फ हनमा चव्हाण आणि एका अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राहुल आणि आरोपी संदेश हे दोघे डोणजे चौकातील एकाच इमारतीत राहत होते. सोमवारी रात्री मित्राच्या वाढदिवसासाठी राहुल दुसऱ्या मित्रासमवेत घरातून बाहेर पडला. पानशेत रस्त्यावरून वाढदिवसासाठी चालत जात असताना या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी अंधारात दुचाकीवरून तिघे जण आले. त्यातील संदेशने कोयत्याने राहुलवर सपासप वार केले आणि पसार झाला. यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. हवेली पोलीस तपास करत आहेत.