डॉ. नरेंद्र दाभोलकर  हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची एकत्रित चौकशी

0
813

पुणे, दि. ३० (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडीत पुणे न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करायची असल्याने सीबीआय कोठडी वाढवून देण्याची मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांनी ऑगस्टमध्ये सचिन अंदुरेला अटक केली होती. गुरुवारी अंदुरेला सीबीआयने पुणे न्यायालयात हजर केले. सरकारी वकिलांनी सचिनची सीबीआय कोठडी दोन दिवसांनी वाढवून द्यावी, अशी विनंती केली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची एकत्रित चौकशी करणे गरजेचे असल्याने कोठडी वाढवून देण्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सचिन अंदुरेच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. सचिन अंदुरेला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले जाणार आहे.