ठेवीदारांचे वाटोळे करणाऱ्या ‘शुभ कल्याण’च्या दिलीप आपेटला पुण्यातून अटक

0
1166

पुणे, दि. २५ (पीसीबी) – ठेवीदारांना जवळपास १० कोटींपेक्षा जास्त रकमेला गंडा घातल्याप्रकरणी, शुभ कल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिलीप आपेटला अटक करण्यात आली आहे. ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून, दिलीप आपेटने ठेवीदारांना गंडवल्याचा आरोप आहे. त्याने ठेवीदारांचे पैसे परत दिलेच नाहीत. दिलीप आपेट मागच्या अनेक महिन्यापासून कुटुंबासमवेत परार होता. काल (शुक्रवारी) पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली. बीड जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या.

शुभ कल्याण मल्टीस्टेट बँकेच्या राज्यात आणि राज्याबाहेरही जवळपास शंभर शाखा होत्या. ज्या शाखांमधून जास्तीचे व्याजदर देण्याचे आमिष ठेवीदारांना दाखवले होते. मात्र ठेवीदारांनी जे पैसे गुंतवले ते त्यांना परत मिळालेच नाहीत. शिवाय दिलीप आपेटची खासगी मालकी असलेल्या शंभू महादेव साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊसाचे ५५ कोटी रुपये थकीत रक्कम देणे बाकी आहे. दिलीप आपेट आणि संचालकांवर बीड जिल्ह्यात एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. राज्यभरातही विविध ठिकाणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

नाव शुभकल्याण आहे, मात्र या बँकेने बीड जिल्ह्यातील हातावर पोट भरवणाऱ्या अनेक ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवले. बँकेचा संचालक गेली अनेक दिवस पोलिसांच्या हाती लागत नव्हता. कधी काळी भाजपचे काम करणाऱ्या दिलीप आपेट या व्यावसायिकाने बँकेच्या माध्यमातून लोकांना हा गंडा घातला.

इतर बँकाच्या तुलनेत शुभकल्याण मल्टीस्टेट बँक ठेवीवर जास्त व्याजदर देण्याची ऑफर देत होती. याच भूलथापांना बळी पडून परळीच्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये नोकरी करुन निवृत्त झालेल्या शंकर राऊत यांनी आपल्याकडील पेन्शनचे आलेले सगळे २३ लाख रुपये या बँकेत फिक्स केले. सुरुवातीचे तीन-चार महिने व्याज मिळाले. मात्र पुन्हा या बँकेला टाळे लागले जे अद्याप उघडलेले नाही. शंकर राऊतांसारखे अनेक गुंतवणूकदार पुरते फसले आहेत.