ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
243

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी, दि. 30) सकाळी भक्ती शक्ती चौक, निगडी येथे घडला.

अकबर अल्ली सिद्दीकी (वय 45, रा. रुपीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सिद्दीकी त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / सी झेड 8037) शुक्रवारी सकाळी रुपीनगर येथून आकुर्डीच्या दिशेने जात होते. निगडी मधील भक्ती शक्ती चौकात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने (जी जे 24 / एक्स 2082) जोरात धडक दिली. यामध्ये सिद्दीकी ट्रकखाली आले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

नव्याने बांधण्यात आलेल्या भक्ती शक्ती चौकातील या पुलावर अपघाताची ही तिसरी वेळ आहे. शहराचे आकर्षण ठरणाऱ्या या पुलावर वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने दोन अपघात झाले आहेत.