ट्रकच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रकचालकही ठार

0
494

सांगली, दि. २ (पीसीबी) – भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका सहा वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने केलेल्या मारहाणीत ट्रकचालकाचाही मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.१) रात्री अकराच्या सुमारास सांगली-हरिपूर रोडवरील लिंगायत स्मशानभूमीजवळ घडली.

ऋचा सुशांत धेंडे(वय ६) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तर कुमार श्रीकांत आळगेकर (वय ४५, रा. हरिपूर) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली-हरिपूर रस्त्यावर शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ऋचा आपल्या काकासोबत दुचाकीवरुन घरी निघाली होती. चौकात वळण घेत असतानाच समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक दुचाकीला बसली. ट्रक चालकाला वेग नियंत्रित न करता आल्याने त्याने दुचाकीला उडविले. यात ऋचाचे काका दुसऱ्या बाजूला फेकले गेले, तर ऋचा रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णलायात नेले असता तिला मृत घोषीत करण्यात आले.

दरम्यान, ट्रकवरील नियंत्रण सुटलेल्या कुमार आळगेकरने पुढे जाऊन आणखी एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर पुढे असलेल्या कमानीला जाऊन धडकला. हा प्रकार समजताच संतप्त जमावाने कुमारला बाहेर खेचले आणि बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला. या प्रकारामुळे सांगली- हरिपूर रोडवर तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार समजतात ग्रामीण व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला हटवून ट्रक चालकाला सांगलीत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सांगली शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.