भारताच्या इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी धमकावले

0
585

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये  भारतीय उच्च आयुक्तालयाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याचा आणि त्यांना धमकावल्याचा प्रकार आज (शनिवार) घडला आहे.  तसेच  त्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी पाहुण्यांना कार्यक्रम स्थळावरुनही बळजबरीने परत पाठवले.  यामुळे भारत-पाकिस्तानमधील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी होटेल सेरेनाच्या बाहेर घेराव घातला आणि पाहुण्यांना धमकावून त्यांना परत पाठवण्यात आले. ‘इफ्तार पार्टीतून बळजबरीने परत पाठण्यात आलेल्या आमच्या सर्व पाहुण्यांची आम्ही माफी, अशाप्रकारे धमकावण्याचा प्रकार निराशाजनक आहे. त्यांनी राजकीय शिष्टाचार तसेच सभ्य व्यवहाराचे तर उल्लंघन केलेच याशिवाय दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधही बिघडवले आहेत’, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी दिली.

विविध माध्यमांतील वृत्तानुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय पाहुणांना निरनिराळ्या क्रमांकावरुन फोन करुन धमकावले तसेचं पार्टीत सहभागी झाल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावे लागेल, असा इशारा दिला होता. अवमान झाल्यामुळे इस्लामाबादेतील भारतीय उच्चायोगाच्या इफ्तार पार्टीत खूप कमी जण पोहोचले. यावेळी पार्टीमध्ये बोलतानाही बिसारिया यांनी अत्याधिक तपासणीतून जावे लागलेल्या सर्व मित्रांची माफी मागतो, असे म्हणत  दिलगिरी व्यक्त केली.