झारखंडमध्ये सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

0
329

डुमका, दि. २ (पीसीबी) – झारखंडच्या डुमका येथे आज (रविवार) सकाळी सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, यात एक जवान देखील शहीद झाला असून अन्य चार जवान जखमी झाल्याची माहिती आहे. झारखंडच्या डुमका येथे रानेश्वर ठाण्याच्या हद्दीत कठलियाजवळ ही चकमक उडाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शिकारीपाडा आणि रानेश्वर ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, त्यांना जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. जवानांच्या प्रत्युत्तरात चार ते पाच नक्षलवादी ठार झाले. पण दुर्दैवाने एक जवान देखील शहीद झाला आणि अन्य चार जवान जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला हेलिकॉप्टरने रांची येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर अन्य जखमी जवानांवर डुमका येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.