झारखंडमध्ये भाजपला झटका; लोक जनशक्ती पक्ष (लोजप) स्वतंत्र लढणार

0
415

नवी दिल्ली,दि.१३(पीसीबी) : एनडीएतील घटकपक्ष लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) झारखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
लोजपने ‘एनडीए’चा सहकारी पक्ष म्हणून सहा जागांची मागणी केली होती. मात्र रविवारी भाजपने आपल्या 52 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यावर आम्ही झारखंडमध्ये स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहोत, असे चिराग पासवान यांनी सोमवारी सांगितले होते.

आम्ही यावेळी टोकनच्या स्वरूपात दिलेल्या जागांचा स्वीकार करणार नाही. रविवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यांतील अनेक जागांची मागणी आम्ही केली होती, असे चिराग पासवान म्हणाले.
लोक जनशक्ती पक्षाची धुरा खांद्यावर घेतलेले खासदार चिराग पासवान यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. झारखंडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं प्रदेशाध्यक्षांनी ठरवलं आहे. लोजप 50 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यांमध्ये झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 81 सदस्यसंख्या असलेल्या या विधानसभेचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर होईल.